फसवून पळून गेला ठग… नगरसेवकाने आधार दिला मग….

 


उत्तर प्रदेशला जाण्याकरता वण वण फिरत असलेल्या मजुरांना संतोष शेट्टी यांच्याकडून दिलासा
पोलिस प्रशासनाच्या मदतीने मूळगावी पाठवणार
नवीन पनवेल येथील वृंदावन बाबा आश्रमात राहण्याची व्यवस्था
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी: महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवले जात आहे. त्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या दररोज सोडल्या जात आहेत. असे असतानाही काही गरीब आणि निराधार मजुरांच्या असहायतेचा फायदा घेऊन काहीजण त्यांची फसवणूक करीत आहेत . असाच प्रकार बुधवारी नवीन पनवेल परिसरात घडला. उत्तर प्रदेश ला जाणाऱ्या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकऱ्यांची घोर फसवणूक केली. त्या विवंचनेत दिशाहीन झालेले मजूर नवीन पनवेल मध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येतात पनवेल महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी आणि इतर भाजप कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांची राहण्याची व्यवस्था करून जेवण व इतर सुविधा उपलब्ध केल्या. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या मदतीने त्यांना मूळ गावी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामगारांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभर लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण त्यामध्ये अडकले आहेत. विशेष करून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पनवेल परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातून जास्त करून पनवेल परिसरात या कामगारांना आपल्या मूळ गावी पाठविण्यात येत आहे. जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त जण आपल्या घरी गेले आहेत. अद्यापही अनेक कामगार अडकून पडले आहेत. संबंधितांना त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. असे असताना खाजगी वाहनांनी सुद्धा कित्येक जण आपल्या मूळ गावी जात आहेत. परंतु यामधून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. बुधवारी नवीन पनवेल परिसरातही अशीच घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील एकूण 45 मजुरांना तुम्हाला गावाला सोडतो असे सांगून एका पुणे येथून आलेल्या टेम्पो चालकाने पैसे घेतले. बिगारी काम करणाऱ्या या श्रमिकांकडे जे पैसे होते ते गावाला जाण्याच्या आशेने देऊन टाकले. मात्र त्या लखोजी लोखंडेने तेथून पोबारा केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता गावाला जायचे कसे, काय खायचे, कुठे राहायचे अशा अनेक प्रश्न आणि विचारांनी त्यांना भंडावून सोडले. नैराश्य व विवंचनेत ते नवीन पनवेल डी-मार्ट जवळ रस्त्यावरून फिरताना दिसले. बाजूच्या सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत नगरसेवक संतोष शेट्टी यांना कल्पना दिली. शेट्टी यांनी त्वरित त्याठिकाणी जाऊन या कामगारांची विचारपूस केली. घडलेला प्रकार आणि झालेली फसवणूक त्यांनी कथन केली. ही विदारक परिस्थिती सांगत असताना त्या मजुरांच्या डोळ्यात पाणी आले. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेला कायम बरोबर घेऊन फिरणाऱ्या संतोष शेट्टी यांचेही हृदय हेलावले. या वैश्विक संकटात त्यांनी गरीब निराधार कामगारांना आधार दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी या घटनेबाबत फोनवरून चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार त्वरित या सर्व श्रमिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यांना बाजूच्या वृंदावन बाबा आश्रमात राहण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर गुरुद्वारा कमिटीकडूनही सहकार्य करण्यात येत आहे . नगरसेवक शेट्टी यांनी या प्रकार खांदेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्याचबरोबर याबाबत महानगरपालिका प्रशासनालाही कळविण्यात आले. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
या सर्व कामगारांना श्रमिक रेल्वेगाडीने उत्तर प्रदेशला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल असे पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आले. तोपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था वृंदावन आश्रमात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जेवण अल्पोपहार तसेच इतर सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. पनवेल चे छटपूजा समिती चे बी पी सिंग, उत्तरप्रदेश पनवेल समिती चे अध्यक्ष जितेंद्र तिवारी हे सुद्धा नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या सोबत होते. शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत खरोखर अडचणीत सापडलेल्या गरीब श्रमिकांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.