आष्टे लॉजिस्टिक कंपनीत कोरोनाचा संसर्ग

 


वेअर हाऊस बंद ठेवण्याचे तहसीलदारांचे आदेश
पनवेल संघर्ष समितीच्या मागणीची दखल
पनवेल प्रतिनिधी:- तालुक्यातील कसळखंड व आष्टे गावाच्या हद्दीत असलेल्या आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना कोरोना संसर्ग झाला आहे. तरीसुद्धा संबंधित कंपनीचे कामकाज सुरू होते. दरम्यान कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून संबंधित वेअर हाऊस बंद ठेवण्यात यावे. अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे केली होती. दरम्यान शुक्रवारी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून कामकाज बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले.
आष्टी लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे कोविड19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कामगारांना कंपनीच्या आवारातच संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कामगारांना कोविडची बाधा झाली असतानाही कामकाज सुरू होते. त्यामुळे या कंपनीमधील आणखी कामगारांना लागण होण्याची शक्यता होती. दरम्यान याविषयी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले आणि तहसीलदार अमित सानप यांना संबंधित कंपनी कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी काही दिवस बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी आष्टे लॉजिस्टिक कंपनीला पुढील आदेश होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे पनवेल तहसीलदारांकडून आदेश निर्गमित केले आहेत.