नवीन आयुक्तांचा पहिला दणक: ओरियन मॉल मधील बिग बझारवर कारवाई

 


आदेशाची पायमल्ली केल्याने गुन्हा दाखल
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शुक्रवारी ओरियन मॉल मधील बिग बझारातील कपड्याच्या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन न केल्याने हे कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे.

पनवेल महापालिका आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवन देखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिका-यांना दिलेला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती.
परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करत आहेत.
पनवेल ओरियन मॉल मध्ये शुक्रवार असताना बिग बझारतील कापडाचे दुकान चालू ठेवून मनपा ने ठरून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले . त्यामुळे नवीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती “ड” चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी सदरचे दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल केल आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत जर कोणी लाॅकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.