भाजपाचे ‘अंगण’ झाले शासना विरोधातील ‘रणांगण’

 


पनवेल भाजपा कार्यालयासमोर सामाजिक अंतराने आंदोलन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती
पनवेल/ प्रतिनिधी:- महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. शासनाकडून ठोस अशा उपाययोजना केल्या जात नाहीत. सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. हे आरोप करीत पनवेल भारतीय जनता पक्षाकडून शहरातील मध्यवर्ती कार्यालयाचा अंगणात आघाडी सरकारविरोधात सामाजिक अंतराने आंदोलन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या
मेरा आंगण… मेरा रणांगण..महाराष्ट्र बचाव आंदोलनात एक प्रकारे ठाकरे सरकारविरोधात रण पेटवण्यात आले.
कोरोना वरून आता महाराष्ट्रात राजकारण पेटू लागले आहे. मुंबईसह इतर महानगरात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. यामहामारी रोगामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकंदरीतच या सर्व गोष्टीला आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारण्यात आले होते. आपल्या अंगणात सामाजिक अंतराने उभे राहून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्याचे आवाहन पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार पनवेल परिसरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालय समोर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काळे मास्क लावून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, कोरोना संकटाला जबाबदार ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार, हातात वाडगे केंद्राकडे बोट निर्णयात मात्र तुझ्याच खोट असे शासन विरोधी काळे फलक फडकवण्यात आले. कोरोना ची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला अपयश आले आहे . सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पनवेल परिसरात अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्या कोविड योद्ध्यांना संसर्ग होत आहे. त्यांचे कुटुंबही संक्रमित होत आहेत. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून ठोस अशा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. हे सरकारचं निष्क्रिय असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. केंद्र सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने एक दमडी सुद्धा सर्वसामान्यांच्या हितासाठी जाहीर केली नाही. असा घणाघाती हल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारवर चढवला. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.