वाढीव पाणीपट्टी ने रहिवाशांचे तोंडचे पाणी पळाले

कोरोना वैश्विक संकटात सिडकोकडून तिप्पट पाणी देयके
काँग्रेस पक्षाकडून वाढीव बिलास तीव्र विरोध
पनवेल /प्रतिनिधी:- कोरोना या वैश्विक संकटात संपूर्ण जग अडकलेले आहे. त्याला सिडको वसाहती अपवाद नाहीत. या कालावधीत रहिवाशांना मदतीचा हात देण्याऐवजी सिडकोने पाणी बिलात जवळपास तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी आवाज उठवला आहे. हे वाढीव दर त्वरित रद्द करण्यात यावेत अशी मागणी सिडकोच्या मुख्य अभियंता कडे त्यांनी केली आहे.
नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे याठिकाणी सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी यांच्याकडून सिडको पाणी घेऊन ते वसाहतींना पुरवते. त्याचबरोबर खारघर ला हेटवणे धरणातून पाणी येते. दरम्यान मागणीप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून सिडको वसाहतींना पाणी मिळत नाही. तीस ते पस्तीस टक्के काही ठिकाणी 40 टक्के पाणी कमी येते. त्यामुळे पाणीटंचाई या समस्येने सिडको वसाहतवासीय त्रस्त आहेतच. ऐन पावसाळ्यातही अनेक सोसायट्यांना या समस्येला सामोरे जावे लागते लागते. उन्हाळ्याचे चार महिने पाणीटंचाईला हक्काचे दिवस येतात. वसाहती विकसित करताना त्यांची तहान भागवण्यासाठी प्राधिकरणाकडून योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी त्याचा त्रास रहिवाशांना भोगावे लागत आहे. दरम्यान सिडकोने या वसाहती विकसित केल्या आहेत. अद्यापही नोड पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाहीत. काही सेवा फक्त मनपा देत आहे. परंतु गेल्या दोन महिन्यापासून कोरोना या महामारी विरोधात लढा सुरू आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोने याकरीता पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. उलट सिडकोने पाणीपट्टी मध्ये वाढ केले आहे. याअगोदर प्रति घनमीटर पाण्यासाठी सात रुपये मोजावे लागत होते. आता सिडकोने त्यामध्ये वीस रुपये वाढ केली आहे.
ही दर वाढ करताना रहिवाशांना विश्वासात घेण्यात आले नाही. ही देयके एप्रिल महिन्या नंतर तयार करण्यात आलेली आहेत. मार्च महिन्यात देशात लाॅकडाऊन झाल्यामुळे, बँकांनी सुद्धा आपले ई एम आय रोखून धरावे असे सरकारी धोरण आहे. असे असताना पाण्याचे वाढीव देयके 31 मे पर्यंत भरावेत असा आग्रह सिडकोकडून धरला जात आहे.
ही दरवाढ कोरोना संकटाच्या काळात मार्च २०२१पर्यंत थांबू शकत नाहीत का असा सवाल काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी केला

“कारण आज अनेक कुटुंबे, पगार नसल्यामुळे बिकट परिस्थितीत जगत आहेत. त्यांना सध्या गृहनिर्माण संस्थांचा नियमित सेवा आकार भरणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे उत्पन्नही कमी होणार आहे. त्यात या जिझिया कराची भर पडणार आहे. त्यामुळे सिडकोने वाढीव पाणीपट्टी चा निर्णय थांबवावा. कोरोना संकट गेल्यानंतर गृहनिर्माण संस्थांची चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा”
सुदाम पाटील
कार्याध्यक्ष
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी