अखेर वाढीव दराने पाणीपट्टी ला सिडकोची स्थगिती

 


जुन्या दराप्रमाणे देयके पाठवले जाणार
पनवेल /प्रतिनिधी:- सिडको वसाहतीत पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली होती. कोरोना या वैश्विक संकटात प्राधिकरणाने पाठवलेल्या सुधारित देयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यामुळे सिडकोने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आता जुन्या दराप्रमाणे ग्राहकांना देयके पाठवण्यात येणार आहेत . यामुळे सिडको वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिडको प्राधिकरण प्रति घनमीटर सात रुपये दराने रहिवाशांना पाणीपुरवठा करत आहे. गेली पंधरा वर्षे त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान यापुढे प्रति घनमीटर वीस रुपये दराने ग्राहकांकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुधारित देयके वसाहतींमध्ये पाठवण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून टाळेबंदी सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक जण घरी बसून आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने पैसेही शिल्लक राहिलेले नाहीत. यापुढे आपला उदरनिर्वाह करायचा कसा असा हजारो कुटुंबांना प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर कोरोनाचे संकट कधी टळेल याबाबतही निश्चित खात्री देता येत नाही. असे असताना सिडकोकडून सुधारित दराने ग्राहकांना पाणी देयके पाठवण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. तीन पटीने आलेले बिल भरायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान याप्रश्नी काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी सिडकोला पत्रव्यवहार करून तीव्र नाराजी व्यक्त केली. ही वाढीव देयके रद्द करण्याची मागणी व्यवस्थापकीय संचालकांना करण्यात आली. त्याचबरोबर ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनीही शनिवारी यासंदर्भात निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर सिडकोने कोविड 19 संकटाचा विचार करून पाणी बिलाच्या वाढीव दराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीप्रमाणेच प्रति घनमीटर सात रुपये दराने पाणी बिल आदा करावे लागणार आहे.

” पाणी शुल्काचे दर सुधारित करण्याचा निर्णय जानेवारी 2020 चा होता आणि फेब्रुवारी – मार्च 2020 च्या बिलिंगला लागू करण्यात आला.
पाणीपुरवठा व पुरवठा उपकरणाच्या देखभाल शुल्काचा विचार करून 15 वर्षांच्या प्रचंड कालावधीनंतर हे दर सुधारित करण्यात आले.
तथापि, जगभरातील साथीच्या परिस्थितीचा विचार करता सिडकोकडून कोणतीही सुधारित बिले दिली जाणार नाहीत.जुन्या दराप्रमाणे पुढील बिलिंग मध्ये तोडगा काढला जाईल.”
प्रिया रतांबे
जनसंपर्क अधिकारी सिडको