एक वर्षाची खासदारकी …..


महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन अडीच दशकांपासून कोकणातील एक नाव कायम अग्रभागी राहिले. ते म्हणजे सुनील तटकरे होय! रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री त्यामध्ये ऊर्जामंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदामंत्री ही महत्त्वाचे खाते त्यांनी सांभाळली. रायगडचे पालकमंत्री सुद्धा होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस तटकरे यांचा हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.2019 साली ते रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. आणि त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव करत थेट देशाच्या संसदेत प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे यांच्या लोकसभा सदस्यत्वाला एक वर्ष पूर्ण झाले आहे… त्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत वाचा……..

एक वर्षापूर्वी २३ मे, २०१९ रोजी मी रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलो. आज करोनाच्या भयावह परिस्थितीत या वर्षभराचा आढावा घेताना लोकप्रतिनिधी म्हणून आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे, याचे समाधान वाटते. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी दिलेली संधी व काॅंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई गवई गट, पीआरपी कवाडे गट अशा सर्व समविचारी पक्षांच्या साथीने ही अटीतटीची निवडणूक जिंकून आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.

दिल्लीत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मराठीचा आवाज सभागृहात गाजवण्याचे काम करता आले. ॲाल इंडिया रेडियोवर मराठी वृत्तविभाग बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वप्रथम सभागृहात निषेध केला. थळ ता.अलिबाग, जि. रायगड येथील अमोनिया आणि युरियाचा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याबाबत आज संसदेत पुरवणी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला निवेदन केले. इंडियन मेडिकल काऊन्सिल विधेयकावर संसदेत बोलताना राज्याचा अर्थमंत्री असताना मी रायगड जिल्ह्यात जे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते, त्याला केंद्र सरकारने मंजुरी देऊन पुढच्या वर्षभरात हे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास आणावे, अशी विनंती केली. कोकण क्षेत्रात जमीन संपादन आणि जंगल क्षेत्राच्या कामांमुळे अनेक विकासकामे अडकून पडली आहेत, हा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचा केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पात समावेश करण्यात यावा. तसेच त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन NH क्रमांक द्यावा, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती यावी, अशी मागणी सभागृहात केली.

रायगड व रत्नागिरीत जिल्ह्यांचा केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेत समावेश व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन दिले.माझ्या लोकसभा मतदारसंघात खेलो इंडिया अंतर्गत केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन केले. आरसीएफ, ईपीएफ, जेएनपीटी व ओएनजीसी ज्यांचे प्रकल्प रायगडमध्ये स्थापित आहेत, त्यांच्याकडून प्रकल्पग्रस्तांच्या सुविधेसाठी सीएसआर निधी उपलब्ध होण्याच्या मागणी केंद्र सरकारकडे केली.

आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना कोकण रेल्वे तसेच इतर रेल्वेसंबंधी मागण्यांचे निवेदन दिले. कल्याण ते कर्जत व कर्जत ते खोपोली या पट्ट्यातील रेल्वेच्या रुळांचे दुपदरीकरण करावे. तसेच कर्जत हा अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असल्याने त्याचे नुतनीकरण करून ते अधिक सुसज्ज करावे, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. तसेच, पनवेल ते कर्जत प्रवासासाठी थेट रेल्वे उपलब्ध होऊन प्रवाशांना ट्रेन बदलण्याच्या त्रासापासून सुटका मिळावी यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ (एमयुटीपी ३) या प्रस्तावित प्रकल्पाकडे लक्ष देऊन तो लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती केली. नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांना खेड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी निवेदन दिले होते, हे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. थळ ते पेण म्हणजेच पेण ते अलिबाग रेल्वे सुरू करण्याचेही निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले. मुळशी धरणातून रायगड जिल्ह्यात नागरीकरण आणि औद्योगिकीकरणासाठी पाणी उपलब्ध होते, ते पाणी पश्चिमेकडे वळवण्याचा सरकारचा विचार सुरू आहे, त्याबाबत पुनर्विचार करावा, अशीही मागणी केली.

रायगड किल्ला, महाड येथील चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे या ठिकाणांचा विकास तसेच रायगड-रत्नागिरीला लाभलेले महर्षी कर्वे, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन भारतरत्नांचे कोकणात एकत्रित राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहाघर येथे पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणे, कोकणाच्या आदिवासी भागात केंद्र सरकारचा निधी मिळावा, बीएसएनएलच्या खंडित झालेल्या सेवेचा प्रश्न असे अनेक मुद्दे सभागृहात मांडले.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ज्या योजना आखल्या आहेत, त्या महाराष्ट्रात नेण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. तसेच, प्रदूषणविरहित कारखाने आणि पर्यटनावर आधारित उद्योगधंद्यांद्वारे रोजगारनिर्मिती करण्याकडे कल आहे. केंद्रीय नारळ बोर्डाला कोकणासाठी चालना द्यावी यासाठीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच, आंबा,नारळ, काजू, कोकम आदी फळांवर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास रोजगार निर्माण होतील, त्यामुळे प्रक्रिया उद्योग मोठ्या संख्येने उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माझे प्रयत्न सुरू आहेत. अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा हे दोन अल्पसंख्याक बहूल तालुके वगळण्यात आले. या तालुक्यांचा समावेश करून घेण्याची मागणी मी लावून धरली होती. त्याबाबतचा पत्र व्यवहारदेखील राज्य शासनाकडे केला होता. या संदर्भात आज अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांची दिल्ली येथे भेट घेतली व निवेदन दिले.

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गाव संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले आहे. या गावात सर्व समाजांची माणसं एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. शेतकरी बंधू-भगिनींची तसेच तरुणांची संख्या मोठी आहे. अशा गावाचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने हे गाव दत्तक घेतले आहे. मतदारसंघातील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न, स्थानिक विकासकामे, समाजमंदिरांची उभारणी अशा अनेक कामांच्या निमित्ताने आपल्यात येत राहिलो. रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील समस्या वाढत असून महाड ट्राॅमा केअर सेंटर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, रोहा येथील ग्रामीण रुग्णालयातील समस्या, अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देणे, १०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सच्या समस्या यासारख्या अनेक विषयांसंबंधी आरोग्य मंत्र्यांना अवगत केले, त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील उसर येथे वैद्यकीय महाविद्यालय नियोजित आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली या महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे हे १०० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५० खाटांचे संलग्न रुग्णालय असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. तसेच इथल्या तरूणांना नमस्कार वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना अजित दादांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

दिवेआगार येथील चोरीला गेलेल्या श्रीगणेशाच्या सुवर्णमूर्तीचे सोने देवस्थानाला परत मिळावे यासाठी राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांची आज मुंबईत भेट घेतली. यावर तात्काळ कारवाई करून हे सोने देवस्थानाकडे परत देण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

पावसाळयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत प्रशासनासोबत आपल्यामध्ये येऊन मला काम करता आले. ओल्या दुष्काळातील नुकसानग्रस्त शेतकरी, फळउत्पादक व मच्छिमारांना भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. आज करोनाच्या संकटातही कुक्कुटपालक व्यावसायिक, शेतकरी, मच्छिमार यांच्या नुकसानीसंदर्भात राज्य व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. मच्छिमार बांधवांना या संकटात आर्थिक आधार देण्याची विनंती करत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मच्छिमारांना डिझेल परतावा मिळावा यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी सतत पाठपुरावा केला व राज्य शासनाने हा परतावा देण्याची घोषणा केली, याचे समाधान वाटते. त्याबरोबरच, कोकणातील आंबा, काजू, सुपारी अशा फलउत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या माझ्या मागणीचीही राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली व फळांच्या वाहतुकीस परवानगी देत बाजारपेठ उपलब्ध करून दिली. अन्नधान्य, मास्क, पीपीसी किट, थर्मोमीटर, क्वारंटाईनच्या सुविधा, कोकणात येत असलेल्या चाकरमान्यांची व्यवस्था असं आपल्यासाठी जे-जे काही शक्य आहे, ते सर्व करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. या संकटातून आपण सर्व एकत्र लढा देत सुखरूप निभावणार आहोत, असा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो. आजवर जे प्रेम व विश्वास आपण दाखवला, तोच पुढेही सदैव माझ्यासोबत असू द्या.

खासदार सुनिल तटकरे