दिलासादायक: खांदा वसाहत कोरोना मुक्त ….

 


दहाची दहा रुग्णांना हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज
डॉक्टर्स, परिचारिका व मनपा प्रशासनाचे सभापतींनी मानले आभार
रहिवाशांना यापुढे खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन
पनवेल/ प्रतिनिधी:- प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांचा प्रभाग असलेल्या खांदा वसाहतीतील दहाची दहा रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे ही वसाहत आता पूर्णपणे कोविड १९ मुक्त आहे. याबद्दल भोपी यांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले. त्याचबरोबर रहिवाशांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक करून यापुढेही खबरदारी आणि काळजी घेण्याचे भावनिक आवाहन केेले आहे.

प्रभाग क्रमांक१५ चा समावेश असलेली खांदा वसाहत नवीन पनवेल नोडचा पश्चिम भाग आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वसाहतीत मोठ्या संख्येने चाकरमानी राहतात. येथून मुंबई ,नवी मुंबईत ठाणे येथे अत्यावश्‍यक सेवेसाठी अनेकजण जातात. मात्र त्या तुलनेत वसाहतीत कोरोना नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. दुर्दैवाने
श्रीजी संघ या सोसायटीतील एका रहिवासाचा कोरोनामळे मृत्यू झाला. संबंधित मृत व्यक्ती हे मुंबईला कामासाठी जात होती. कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाला. दरम्यान यामुळे त्यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती . त्यापैकी चार जण सागर दीप सोसायटीत राहतात. त्याचबरोबर वसाहतीतील आणखी दोघांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने हे सर्वजण ठणठणीत बरे झाले आहेत. या ठिकाणच्या डॉक्टर आणि परिचारकांच्या प्रयत्नाला यश मिळाले. खांदा वसाहतीतील कोरोनाबाधीत दहाही रुग्णांनी उपचाराला प्रतिसाद दिला. त्यांनी या महामारी रोगाला हरवण्यासाठी मोठे धाडस आणि धैर्य दाखवले, उत्तम उपचार आणि कमालीचा आत्मविश्वास यामुळे कोरोना या रोगाला खांदा वसाहतीतील दहाही जण हरवू शकले. दरम्यान महानगरपालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांनी योग्य खबरदारी घेत कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊन दिले नाही. प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांचा हा स्वतःचा प्रभाग आहे. त्यांच्याकडूनही सातत्याने जनजागृती करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला. काही ठिकाणी सभापतींच्या मागणीनुसार सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले. परिणाम खांदा वसाहतीत आजमितीला कोरोना चा एकही रुग्ण राहिलेला नाही.

“सेक्टर 7 व्हिजन सोसायटी मधील जे रुग्ण होते. ते ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत. गुरुवारी वसाहतीतील आणखी आठ रुग्ण कोविड 19 मुक्त झाले. त्यामुळे खांदा वसाहतीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. आमदार प्रशांत ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेवक म्हणून पाठपुरावा करता आला. याकरीता डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, महापालिका प्रशासन यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. सर्वांनी एकत्रित येऊन कोरोना विषाणू संक्रमण होणार नाही. याची दक्षता घ्यायचे आहे. ”
संजय दिनकर भोपी
प्रभाग समिती ब सभापती
पनवेल महापालिका