पाणी बिल वाढवण्याऐवजी ते शंभर टक्के माफ करा

 


सिडकोने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
भाजप नगरसेवक समीर ठाकूर आक्रमक
मुख्यमंत्री, आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरमरीत पत्र
पनवेल/ प्रतिनिधी: सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केलाय. इतकेच नाही तर वसाहती विकसित करणाऱ्या सिडको प्राधिकरणाने आपली बांधीलकी उचलत शंभर टक्के पाणी बिल माफ करावे अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. याबाबत सिडकोने रहिवाशांवर लादलेला जुलमी निर्णय मागे घेतला नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिला आहे.
सध्या कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू आहे. अनेकांचा कामधंदा बुडालेला आहे. परिणामी त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. हे संकट नेमके कधी टळेल याबाबत कोणालाही काही सांगता येत नाही. एकंदरीतच या वैश्विक संकटामध्ये अनेक कुटुंबांचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत. पोटाचे खळगे कसे भरायचे, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलेला आहे. त्यातच एकविसाव्या शतकातील विकासित शहरे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सिडको या सर्वात श्रीमंत महामंडळाने मात्र या संकटात कोणतीही सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत नाही. किंवा आपला वाटा ही उचललेला ऐकिवात नाही. यावेळी सर्वसामान्यांना मदत करायचे सोडून त्यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने पाणीपट्टी लादली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिडको विरोधात संपूर्ण वसाहतीमध्ये असंतोष पसरलेला आहे. एकीकडे कोरोना मुळे हवालदिल झालेल्या जनतेवर तिप्पट पाणीपट्टी वाढवून सिडकोने मोठा अन्याय केल्याची भावना सध्या आहे. दरम्यान या वाढीव पाणीपट्टी ला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी तीव्र विरोध केला आहे. नवीन पनवेल शहराला 45 एमएलडी पाण्याची गरज असताना फक्त 34 ते 35 एम एल डी पाणी मिळत असल्याने तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणीप्रमाणे सिडको पाणीपुरवठा करू शकत नाही. प्राधिकरणाकडून सातत्याने एमजेपी कडे बोट दाखवले जात आहे. मात्र पाण्याचे दर तिप्पट वाढवताना सिडको या सर्व गोष्टींचा विचार केला नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. प्राधिकरणाने हे वाढीव दर रद्द करावेच, मात्र आपली काहीतरी जबाबदारी समजून या वैश्विक संकटात संपूर्ण पाणी बिल माफ करावे अशी मागणी समीर ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या पत्रात केली आहे. याबाबत ठोस निर्णय झाला नाही. तर सिडको विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवून त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे.

“हुकूमशाहीपद्धतीने केलेली पाणी पट्टीची दरवाढ हे अन्यायकारक आहे. नवीन पनवेलकरांवर लादलेला पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय मागे घेण्याची सिडको प्रशासनास विनंती केलीआहे.नागरिक कोरोनाच्या संकटात सापडलेले असताना मार्च महिन्यापासून पाणीपट्टीची मोठी दरवाढ करण्याचा कारनामा सिडकोने केला आहे. ही अन्यायकारक व अवास्तव दरवाढ तातडीने रद्द करा आणि लॉकडाऊनच्या कालावधीमधील पाणीपट्टीची बिले संपूर्णतः माफ करून जनतेस दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सिडकोला दिला आहे.”
समीर ठाकूर
पनवेल महानगरपालिका