लॉक डाऊनची नवी मुंबई पोलिसांकडून कडक अंमलबजावणी


परिमंडळ 2 मध्ये 732 जणांवर कारवाई
नियमांचे पालन न केल्यास कायद्याचा बडगा उगारला
पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांचा इशारा
पनवेल /प्रतिनिधी: पनवेल महापालिका हद्द आणि ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागात दहा दिवसांचा लाॅकडाऊन शनिवार पासून सुरू आहे. या महामारी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपा आयुक्त व प्रांताधिकार्‍यांनी पाऊल उचलले आहेत. असे असतानाही काहीजण नियमांचे पालन करत नसल्याने नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला आहे. रविवारी एकूण 332 जणांवर परिमंडळ 2 मध्ये कारवाई करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास तीन हजारांच्या आसपास पोचली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडा शंभरी कडे चालला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तीच परिस्थिती पनवेल ग्रामीण मधील नैना क्षेत्र व करंजाडे आणि उलवे सिडको या सिडको वसाहतींमध्ये आहे. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्याचा दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ३ ते १४ जुलै या कालावधीत महापालिका हद्द, पनवेल ग्रामीण उरण मधील काही ठिकाणी टाळेबंदी घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक अंमलबजावणी धोरण नवी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पनवेल आणि उरण टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडून
हद्दीत १६ ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे.

रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे

१ ) मोटार वाहन कायदा , महाराष्ट्र पोलीस कायदा व इतर कायद्यान्वये ४०४ केसेस
२ ) भादवि कलम १८८ अन्वये ८७ केसेस
३ ) मास्क न लावणे व सामाजिक अंतर न पाळलेबाबत ४ ९ लोकांवर कारवाई
४ ) अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या ८८ लोकांवर कारवाई
५ ) मॉर्निग व इव्हिनिंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २१ लोकांवर कारवाई
६ ) सामजिक अंतर व इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता आस्थापना चालु असल्यास २ कारवाई
७ ) आस्थापना विहीत वेळेत बंद न केल्याबाबत ५ कारवाई
८ ) लॉकडाऊन काळात ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक केल्याबाबत १४ कारवाया
९ ) अनावश्यक बाहेर फिरणा – या व्यक्तींची ६७ वाहने जप्त .

“कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे . रहिवाशांनी अत्यावश्यक , गंभीर वैद्यकीय कारण असल्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडु नये . अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणा – या इसमांवर प्रचलित कायद्यानुसार दखलपात्र तसेच अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बाहेर फिरण्यासाठी वापरण्यात येणारी वाहनेसुध्दा जप्त करण्यात येत आहेत”.
अशोक दुधे
पोलीस उप आयुक्त ,
परिमंडळ २ नवी मुंबई