ब्रेकिंग -जीवनावश्यक वस्तूंची काउंटर विक्री बंद


घरपोच वस्तू पुरवठा करण्यासच परवानगी
औषधाचे दुकान मात्र सुरूच राहणार
पनवेल महापालिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक निर्णय
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिकेने कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी ३ ते १४ जुलैपर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. मात्र त्या नावावर विनाकारण फिरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले नाही. त्यानुसार मनपाने किराणा, भाजीसह इतर जीवनावश्यक वस्तूंची काउंटर विक्री बंद केले आहे. त्याबदल्यात घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. औषधांचे दुकान मात्र सुरू राहतील.

पनवेल महापालिका क्षेत्र रुग्णांची संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाचे प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू आहेत. मात्र मिशन बिगिन अगेनपासून लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल झाला. सम-विषम तारखेला इतर दुकाने सुरू करण्यात आले. परिणामी रुग्णांचा आकडा वाढत गेला. यापूर्वी अत्यावश्यक सेवेत पुरता मर्यादित असलेला कोरोना प्रादुर्भाव स्थानिक पातळीवरही झाला. संक्रमण वाढत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 3 ते १४ जुलै यादरम्यान मनपा क्षेत्रात लाॅकडाऊन जाहीर केला. जीवनावश्यक सेवा वगळून इतर दुकानांना टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र भाजी, दूध ,फळे आणि किराणा खरेदी करण्याच्या नावावर अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना आढळून आले आहेत. परिणामी कोरोनाविषाणू ची साखळी तुटणे कठीण होऊन बसले आहे. नवी मुंबई पोलिसांकडून ठिकाणी नाकाबंदी करून संबंधितांवर कारवाई केली जात आहे. मात्र अनेकजण जीवनावश्यक वस्तूंची ढाल पुढे करत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. गर्दी पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांवर लॉक डाउन काळात निर्बंध आणण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. सोमवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

काय आहेत बदल
अन्नधान्य, भाजीपाला, अंडे, फळे, मासळी, चिकन मटण, दूध यांचा काउंटर सेल बंद करण्यात आला आहे. घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे.
दूध डेअरी सकाळी पाच ते दहा या कालावधीत सुरू राहील. पिठाची गिरणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यादरम्यान सुरू राहिली. रेस्टॉरंट व किचन यांना घरपोच पार्सल करिता परवानगी देण्यात आली आहे.