आता कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही

 


कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे स्वाॅब देता येणार
जास्तीत जास्त चाचण्यासाठी महापालिकेचा निर्णय
आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडून आदेश पारित
पनवेल /प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यापुढे कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन गरज लागणार नाही. त्याशिवाय नागरिक आय.सी.एम.आर. कडे नोंदणीकृत व मान्यताप्राप्त असलेल्या प्रयोगशाळेकडे आपले स्वॅब देऊन चाचणी करू शकता. महापालिका प्रशासनाने याबाबत बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबत आदेश पारित केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या मोठी आहे. त्यातच कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्णही वाढत चालले आहेत. पूर्वी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणाऱ्या पुरता मर्यादित असणारा कोरोना प्रादुर्भाव स्थानिक पातळीवरही पसरलेला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या अगोदर कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले होते. त्याशिवाय स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत चाचणी करता पाठवता येत नसत. परिणामी कोरोना चाचण्यांची संख्या ही मर्यादित होती. जास्तीत जास्त नागरिकांना चाचण्या करून घेता येत नव्हत्या. प्रिस्क्रिप्शन मिळत असल्याने चाचण्यांसाठी वेळ लागत होता. यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी अडचणी येत असत. दरम्यान कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधितांना वेळेत योग्य उपचार करताना शक्य होईल. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. अगोदर कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन अट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या विना प्रिस्क्रिप्शन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये नागरिकांना आपले स्वॅब देऊन कोरोना चाचणी करता येणार आहे.पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना सदृश लक्षणे असलेले रुग्ण दुर्लक्षित होऊ नये व त्यांना मुदतीत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्या चाचण्या वेळेत होणे आवश्यक आहे . या बाबीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.