पारनेरमधील ते पाच सेना नगरसेवक मातोश्रीवर

 


आमदार निलेश लंके यांच्यासह घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई /प्रतिनिधी:- बारामती येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले पारनेर पंचायत समितीचे सेनेचे पाच नगरसेवक बुधवारी मुंबई येथे मातोश्रीवर पोहोचले. दस्तुरखुद्द आमदार निलेश लंके यांनी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हजर केले. दरम्यान नगरसेवकांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुखांचा समोर आपली बाजू मांडल्याचे समजते. यासंदर्भात अद्यापही बैठक सुरू आहे.

पारनेर नगरपंचायत वर अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता आहे. दरम्यान त्यापैकी पाच नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आमदार निलेश लंके यांच्याकडे व्यक्त केली. आम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश न दिल्यास भारतीय जनता पक्षाचा विचार करू अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली. दरम्यान आमदार निलेश लंके यांनी पाचही नगरसेवकांना बारामती येथे नेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवली. त्यावेळीही पवार यांनी त्यांची समजूत काढली. मात्र त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका मांडली. असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याच दिवशी या पाचही जणांनी बारामतीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात आघाडीचे सरकार असताना अशाप्रकारे परस्परांचे नगरसेवक फोडल्याबद्दल चर्चा झाली. माध्यमांवर याबाबत विश्लेषण करण्यात आले. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेचे नगरसेवक परत करण्याबाबत फोन केल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके हे सेना नगरसेवक घेऊन बुधवारी मुंबईत आले. आणि ते थेट मातोश्रीवर या पाचही जणांना घेऊन गेले. संबंधितांनी स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्याचबरोबर काही लेखी निवेदनही उद्धव ठाकरे यांना दिल्याचे माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा उद्देश पाच जणांनी विषद केल्याचे वृत्त आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. हे पाचही नगरसेवक पुन्हा शिवबंधनात अडकले असल्याची माहिती मिळते. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.