पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे आणखी सहा बळी


नव्याने 57 रुग्णांची पडली भर, 30 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महापालिका प्रमाणेच पनवेल ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. ग्रामीणमध्ये आणखी सहा जणांचा या महामारी रोगाने बळी घेतला. त्यामुळे मृतांची संख्या 28 वर गेला आहे. यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे. नव्याने 57 रुग्णांची नोंद झाली. तर 30 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. स्थानिक पातळीवर विषाणूंचे संक्रमण झाल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदई, आपटे, पाटणोली, मोरावे, हरी ग्राम, पाले बुद्रुक येथील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कोप्रोली गावात नव्याने ते रुग्ण सापडले. त्यामुळे हे गाव सुद्धा हादरले आहे. उलवे 5, आकुर्ली 4 करंजाडे येथे तीन रुग्ण सापडले. त्याचबरोबर इतर गावातही नव्याने रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत 1054 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 648 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 338 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.