नवी मुंबई पोलीस बांधवांच्या हातात सुरक्षाबंधन

 


खांदा वसाहत आणि कामोठे पोलिसांना बांधल्या राख्या
नगरसेविका सिताताई पाटील व सामाजिक कार्यकर्त्या निलम आंधळे यांचे अनोखे रक्षाबंधन
पनवेल /प्रतिनिधी:- कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारी खाकीवर्दी गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना नियंत्रणासाठी कर्तव्यावर आहेत . पनवेल परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून खडा पहारा देणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी कोरोना विरोधात मोठे काम केले. आजही ते कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या कोविड योद्ध्यांना खांदा वसाहत नगरसेविका सिताताई सदानंद पाटील आणि कामोठेत सामाजिक कार्यकर्त्या निलम आंधळे यांनी राख्या बांधल्या. या दोघींनी सोमवारी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीचा बिमोड करण्याबरोबरच सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम पोलीस यंत्रणा करते.24 तास 365 दिवस पोलीस ठाण्याचा दरवाजा उघडा असतो. नियम आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई पोलीस करतात. त्यांच्यामुळे अंतर्गत शांतता अबाधित राहते. त्यांच्यामुळेच नागरिक विशेषता महिला सुरक्षित रित्या वावरू शकतात. नोकरी-व्यवसायानिमित्त सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकतात. एकंदरीतच कायद्याचे सुरक्षित राज्य स्थापित करण्यासाठी खाकी वर्दीचा वाटा मोठा आहे. नैसर्गिक आपत्ती, संकट, अपघाताच्या काळात सर्वात अगोदर आपत्ती ग्रस्तांच्या मदतीला कोण धावून येत असेल तर ते पोलीस होय. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समिती त्याचबरोबर वेगवेगळे पथक कार्यरत आहेत. यासाठी खास पोलिसांनी हेल्पलाइन नंबर डिस्प्ले केला आहे. एकंदरीतच स्त्रियांच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट असते. कोरोना या वैश्विक संकटात डॉक्टर परिचारिका यांच्या बरोबरीने पोलिस यंत्रणा काम करीत आहे. विशेष करून नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली खाकी वर्दीतील कोरोना वारियर्स काम करीत आहेत. लॉकडाउन काळात संचार बंदीची योग्य अंमलबजावणी करण्याबरोबरच कोरोना विषाणू ते संक्रमण होणार नाही याकरीता नवी मुंबई पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी वरही नियंत्रण ठेवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांनी गरीब गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्यांना जेवण तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले. कर्तव्यावर असताना काहींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींनी कोरोनावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.अशा खाकी वर्दीतील बांधवाच्या हातात राख्या बांधुन रक्षाबंधनाबरोबर सुरक्षाबंधन खांदा वसाहत व कामोठे येथे करण्यात आले.नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बांधवांच्या हातात राख्या बांधुन त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली.दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंंधळे यांनी कामोठे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन केले. महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा राख्या बांधण्यात आल्या.