वीज वितरण कार्यालयाला भाजपचे प्रतिकात्मक टाळे

कोरोना टाळेबंदी काळात वाढलेल्या वीजबिला विरोधात आंदोलन
वाढवून पाठवलेल्या बिलाची रक्कम त्वरित रद्द करा
आमदार प्रशांत यांनी महावितरणला ठणकावले
अन्यथा अधिकाऱ्यांना बाहेर निघून देण्याचा इशारा
पनवेल /प्रतिनिधी:- कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या टाळेबंदीचा काळात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांना अंदाजे बिल पाठवण्यात आले. त्यामध्ये मोठी तफावत असल्याच्या तक्रारी संपूर्ण राज्यभरात सह पनवेल परिसरातूनही येत आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भिंगारी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी प्रतीकात्मक टाळे लावून वीज बिलाची वाढीव रक्कम रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना बाहेर निघू दिले जाणार नाही. असा इशारा आ. ठाकूर यांनी दिला.

कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून मध्यंतरी वीज मीटरचे  रिडींग घेण्यात आले नाही. संबंधितांना अंदाजे बिल पाठवण्यात आले. एकत्रित मोठ्या रकमेची बिल ग्राहकांना पाठवण्यात आले आहे. परिणामी संबंधित वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊन मध्ये अनेकजण घरी होते. वर्क फ्रॉम होम अनेक घरातून चालले. त्यासाठी तुलनेत अधिक युनिट वीज खर्च झाली. मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी असते उन्हाळ्यात जास्त वीज ग्राहक वापरतात. गेल्यावर्षी या तीन महिन्यात जितके विज बिल होते त्यापेक्षा नक्कीच 10 ते 15 टक्के यंदा बील येणार. कारण लॉक डाऊन मध्ये कित्येक वीजग्राहक 24 तास घरी होते. सहाजिकच अधिकची वीज वापरली गेली. असा दावा महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी केला आहे. काही जणांचा वीज बिलामध्ये नक्कीच तफावत असेल अशी कबुलीही अभियंत्यांनी दिली. चार महिन्याचे वीज बिल एकत्र आल्याने सहाजिकच रक्कम जास्तच असणार परिणामी ग्राहकांना वीज बिल अवास्तव आणि वाढीव  वाटत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारी घेऊन अनेक जण  महावितरण कंपनीच्या कार्यालयात जात आहेत. दरम्यान जवळपास 20 ते 30 टक्के वीज बिल वाढवून आलेले आहेत. असे हजारो ग्राहकांचे म्हणणे आहे. कोरोना त्यात लॉकडाऊन परिणामी कित्येकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात अशाप्रकारे वीज बिलांच्या शॉक लागल्याने वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. विज बिल कमी केले जात नाहीत . त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेचे बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जर विज बिल भरले गेले नाही, तर विद्युत पुरवठा खंडित होण्याचीही भीती आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील वीजग्राहक कमालीचे चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत मार्ग निघत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या भिंगार येथील कार्यालयासमोर टाळेबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान वीज पुरवठा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने आपल्या सर्वांवर वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही. आणि मग मुख्य प्रश्न बाजूलाच राहील. या मुळे आज प्रतीकात्मक टाळे लावून महावितरण’ला इशारा देण्यात येत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पनवेल परिसरात आजही अनेक ठिकाणी अखंडित वीज पुरवठा केला जात नाही. कायम वीज गायब होत असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. त्यात अशाप्रकारे वाढीव वीज बिल पाठवण्यात आले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असल्याचे आ. ठाकूर म्हणाले. जनतेला दिलासा देण्याऐवजी त्रास देण्याचे काम केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या तीन तिघाडी काम बिघाडीचा हा परिपाक असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून वाढीव वीज बिलामुळे जनता त्रस्त आहे. मात्र याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. हा नतद्रष्टेपणाच नाही तर निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका आ. ठाकूर यांनी केली. वाढीव वीज बिल रद्द केले नाही तर अधिकाऱ्यांना कार्यालयातून उठून दिले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ कविता चौतमोल, तालुकाध्यक्ष अरुण भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर , भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.