पनवेल महापालिकेत गणेशोत्सवाबाबत समन्वय बैठक


आमदार प्रशांत ठाकूर व बाळाराम पाटील यांची उपस्थितीती
महापौर, सभागृहनेते आणि विरोधी पक्ष नेतेही हजार
पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना या वैश्विक संकटात यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्यावतीने समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि महापौर डॉ कविता चौतमोल उपस्थित होत्या. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि गणेशोत्सवाबद्दल चर्चा करण्यात आली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे. रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर गेले आहे. तरीसुद्धा नव्याने रुग्ण आढळत असल्याने ते कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच अनुषंगाने मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी समन्वय बैठकाचे आयोजन केले होते. यावेळी राज्य सरकारने गणेशोत्सवाकरीता दिलेल्या मार्गदर्शक नियमानुसार हा उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पारंपारिक गणेश मूर्ती ऐवजी धातु संगमरवर च्या मूर्तीची पूजा करण्यात यावी. विशेष करून शाडूच्या मातीच्या मृर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी. त्यांचे विसर्जन घरच्या घरी करण्यात यावे. किंवा जवळच्या कृत्रिम तलावात  बाप्पांना निरोप देण्यात यावा. मूर्तींचे उशिरा विसर्जन करण्याबाबत शासनाने दिलेल्या सूचनांची माहिती यावेळी सुधाकर देशमुख यांनी दिली. पनवेल महानगरपालिकेकडून गणेश मुर्ती घेण्याबाबतही व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी शक्यतो पाण्यामध्ये मूर्तींचे विसर्जन करू नये असा प्रस्तावही आयुक्तांनी दिला. भाविकांनी पाण्यात जाऊ नये त्याचबरोबर भिजू नये अशाप्रकारे आवाहन महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रोशनाई भपकेबाजी न करता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ही चर्चा झाली. आरोग्यविषयक सामाजिक संदेश, मंडपात निर्जंतुकीकरण व्यवस्था, भाविकांची थर्मल स्कॅनिंग, सामाजिक अंतर पाळून बाप्पांचे दर्शन याबाबतही माहिती देण्यात आली. ऑनलाईन दर्शनचा प्रस्तावही देण्यात आला. यंदा गणेशोत्सवात कुठे गर्दी होणार नाही. त्याचबरोबर कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही. याची सर्वांनी मिळून खबरदारी घेण्याबाबत बैठकीत ठरले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेने अशाप्रकारची 1000 इंजेक्शन उपलब्ध द्यावेत. जेणेकरून काळाबाजार होणार नाही. तसेच रुग्णांना त्वरित इंजेक्शन मिळतील असे ते म्हणाले. आपल्या मागणीनुसार रेमडीसीवीर इंजेक्शन मागविण्यात आले असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. मुंबई पुण्याच्या धर्तीवर पनवेल परिसरातील दुकान रोज सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अशी मागणी आ. ठाकूर आणि बाळाराम पाटील यांनी केली. पुणे महानगरपालिकेच्या गाईडलाईन्स पाहून त्यावर विचार केला जाईल. त्यानंतर पनवेल महानगरपालिका निर्णय घेईल अशी ग्वाही सुधाकर देशमुख यांनी दिली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, गोपीनाथ भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.